- राज्य
- 'रात गयी, बात गयी आता जोरदार खेळणार नवी इनिंग'
'रात गयी, बात गयी आता जोरदार खेळणार नवी इनिंग'
क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांची टोलेबाजी
जळगाव: प्रतिनिधी
विधिमंडळात रमी खेळण्यावरून टीका झालेले मंत्री माणिकराव कोकाटे यांनी मागचे सगळे विसरून नवी इनिंग जोरदारपणे खेळण्याची ग्वाही पत्रकारांशी बोलताना दिली. प्रत्येक वेळी मागचे उकरून काढायचे नसते. रात गई, बात गई. पुढे चालायचे असते, असेही ते म्हणाले
उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांचा संघटनात्मक आढावा घेण्यासाठी जळगाव दौऱ्यावर आहेत. यावेळी उपस्थित राहण्यासाठी कोकाटे हे देखील येथे आले आहेत. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
तत्कालीन कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर रमी प्रकरणी विरोधक आणि शेतकरी यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर टीका झाली. त्यांची मंत्रिमंडळातून उचलबांगडी होण्याची चर्चा देखील त्या काळात रंगली होती. मात्र, त्यांना डच्चू देण्याऐवजी खाते बदल करण्यात आला. क्रीडा मंत्रालयाची जबाबदारी त्यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.
आता माझ्याकडे क्रीडा विभागाची जबाबदारी आहे. यापुढे समाजासाठी, लोकांसाठी काय करता येईल हे पाहणार आहे. दरवेळी मागे काय घडले याच्या खोलात जाण्याची आवश्यकता नसते. यापुढे क्रीडा क्षेत्रात काय करता येईल, यावर लक्ष केंद्रित करणार आहे. ही इनिंग निश्चितपणे जोरदार खेळणार आहे, असे कोकाटे यांनी सांगितले.