'सामाजिक जीवनात पाळावी लागतात पथ्य'
एकनाथ शिंदे यांच्या आपल्या आमदारांना कानपिचक्या
मुंबई: प्रतिनिधी
सार्वजनिक जीवनात काम करत असताना काही पथ्य पाळावीच लागतात. कमी वेळात अधिक यश मिळाले म्हणून डोक्यात हवा जाऊ देऊ नका. कोणत्याही पदावर असाल तरी आपण कार्यकर्ता आहोत हे समजून वागा, अशा शब्दात उपमुख्यमंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख एकनाथ शिंदे यांनी आपल्या आमदारांना कानपिचक्या दिल्या.
नुकत्याच घडलेल्या काही घटनांमुळे शिवसेना शिंदे गटाच्या काही नेत्यांना विशेषतः विरोधकांनी टीकेचे लक्ष्य केले आहे. निकृष्ट दर्जाचे जीवन दिले म्हणून आमदार संजय गायकवाड यांनी आकाशवाणी आमदार निवासाच्या कॅन्टीनमधील कर्मचाऱ्याला मारहाण केली. त्याचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला.
राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांना आयकर विभागाकडून नोटीस देण्यात आली. त्यानंतर ते शयनगृहात बसलेले असताना त्यांच्या शेजारी असलेल्या बॅगेचा व्हिडिओही व्हायरल झाला. ही बॅग नोटांनी भरलेली असल्याचा आरोप करण्यात आला. मात्र, शिरसाट यांनी हा आरोप नाकारला असून त्याबद्दल शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार असल्याचे सांगितले आहे.
या घटनांचा संदर्भ घेऊन आमदारांशी बोलताना शिंदे म्हणाले की, तुम्ही सर्व माझी माणसे आहात. आपण सारे एक कुटुंब आहोत. तुमच्याकडे दाखवलेले बोट माझ्याकडे असते. तुमचे आमदार काय करतात, असा प्रश्न मला केला जातो. मी रागावत नाही. आपल्या माणसांवर कारवाई करणे मला आवडणार नाही. त्यामुळे कारवाई करण्याची वेळ येणार नाही, अशी वागणूक ठेवा, असे शिंदे यांनी आमदार आणि मंत्र्यांना सांगितले आहे.
चुकीच्या गोष्टींमध्ये आपली ऊर्जा वाया घालवू नका. कमी बोला आणि अधिक काम करा. आपल्या पक्षाला कमी वेळेत अधिक यश मिळाले आहे. त्यामुळे बदनामीचे डाव रचले जात आहेत. त्यामुळे वागताना आणि बोलताना योग्य ती काळजी घ्या, असे सांगतानाच बदनामीमुळे काही मंत्र्यांना घरी बसावे लागले, याची आठवण देखील शिंदे यांनी करून दिली.