- राज्य
- नव्या कृषीमंत्र्यांनी देखील केली वादग्रस्त विधानाने सुरुवात
नव्या कृषीमंत्र्यांनी देखील केली वादग्रस्त विधानाने सुरुवात
विरोधकांकडून आपल्या खात्यावर बारीक लक्ष असल्याचा इशारा
मुंबई: प्रतिनिधी
विधिमंडळात रमी खेळत असल्याचा व्हिडिओ प्रसिद्ध झालेले मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या जागी कृषी विभागाची जबाबदारी नुकतीच स्वीकारलेले दत्ता भरणे यांनी देखील पदभार हाती घेताच वादग्रस्त विधान करून सुरुवात केली आहे. त्यावरून विरोधकांनी त्यांना इशारे देण्यास सुरुवात केली आहे.
एका कार्यक्रमात बोलताना दत्ता भरणे यांनी संचालक म्हणून सरळ मार्गाने कारखान्याचे कामकाज सर्वजण करतात. मात्र, वाकड काम करून ते नियमात बसवणाऱ्यांची ठळकपणे नोंद घेतली जाते, असे विधान करून वादाला तोंड फोडले आहे. त्यावरून, आता आम्हाला कृषी विभागात वाकडी कामे होताना दिसणार का, असा सवाल विरोधकांकडून केला जात आहे.
भरणे यांचे पहिलेच वक्तव्य धक्कादायक आणि अत्यंत घातक आहे. आपल्याला सुद्धा वेडीवाकडी कामे करावी लागतात, असे ते म्हणाले आहेत. आधीच सत्ताधाऱ्यांपैकी काही जणांनी वेडीवाकडी कामे करून राज्याची तिजोरी वेडीवाकडी केली आहे. त्यांची संपत्ती मात्र ताडासारखी सरळ वाढत चालली आहे. प्रत्येक मंत्र्यावर आमचे बारीक लक्ष आहे. तुम्ही वाकडी कामे कराल तर जनता तुम्हाला माफ करणार नाही आणि आम्हीही तुम्हाला सोडणार नाही, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी दिला आहे.