- राज्य
- 'समाजात तेढ उत्पन्न होईल अशी वक्तव्य करू नका'
'समाजात तेढ उत्पन्न होईल अशी वक्तव्य करू नका'
अजित पवार यांचे राजकारणी आणि नागरिकांना आवाहन
मुंबई: प्रतिनिधी
घटनेने सर्वांना आपले मत मांडण्याचा अधिकार दिला असला तरी देखील त्याचा गैरवापर करून समाजात तेढ निर्माण होईल, अशी विधाने आमच्यासकट कोणत्याही राजकीय नेत्याने अथवा सामान्य नागरिकांनी करू नयेत, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
सध्याच्या काळात मराठा आरक्षणाचा प्रश्न आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणामुळे ऐरणीवर आला आहे. त्याचवेळी इतर मागास प्रवर्गातील समाज आपले आरक्षण धोक्यात आल्याची भीती व्यक्त करीत आहे. या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी सामाजिक दुफळी न माजविण्याचे आवाहन केले आहे.
जरांगे यांचे उपोषण आझाद मैदानावर सुरू आहे. त्यांच्या मागण्या मान्य झाल्यास राज्यातील ओबीसी समाज रसातळाला जाईल, अशी भीती ओबीसी नेते प्रा लक्ष्मण हाके यांनी व्यक्त केली आहे. जरांगे यांचे आंदोलन मराठा आरक्षणापुरते मर्यादित नाही तर हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार उलथवून टाकण्यासाठीचा कट आहे. या कटात अजित पवार यांच्या पक्षाचे आमदार, खासदार सहभागी आहेत, असा प्रा लक्ष्मण हाके यांचा आरोप आहे.
दुसरीकडे भारतीय जनता पक्षाचे आणि सत्ताधारी महायुतीचे काही नेते आक्रमक विधाने करीत आहेत. त्यांच्या विधानांमुळे पक्ष अडचणीत येत आहे. अशा बोलघेवड्या नेत्यांची तोंडे बंद करण्यासाठी खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आपल्याच नेत्यांना खडे बोल सुनावण्याची वेळ आली आहे. या पार्श्वभूमीवर पवार यांचे विधान महत्त्वाचे ठरते आहे.