- राज्य
- "भाजपसमोर निष्ठावान कार्यकर्त्यांची बंडखोरी रोखण्याचे आव्हान"
"भाजपसमोर निष्ठावान कार्यकर्त्यांची बंडखोरी रोखण्याचे आव्हान"
जयंत खंदारे यांनी दिला घरचा आहेर
पुणे: प्रतिनिधी
महायुती आणि विशेषतः भारतीय जनता पक्षाबद्दल आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांमध्ये उत्साह दिसून येत आहे. मात्र, पक्षाशी निष्ठा असलेल्या तळागाळाच्या कार्यकर्त्यांमध्ये असलेली नाराजी आणि काही प्रमाणात दिसून येत असलेली बंडखोरी रोखण्याचे आव्हान भाजपसमोर आहे, अशी स्पष्टोक्ती पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत खंदारे यांनी केली.
पुण्यासह राज्याच्या विविध भागात भाजप कार्यकर्त्यांमध्ये असलेली नाराजी स्पष्टपणे दिसून येत आहे आणि बंडखोरीच्या रूपाने त्याचे प्रत्यंतरही येत आहे. पुणे शहरात खुद्द शहराध्यक्ष धीरज घाटे आणि माजी शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी बंडाचा झेंडा उभारला आहे. याची कारणमीमांसा करताना खंदारे यांनी अजित पवार यांच्यावर ठपका ठेवला. राज्याचे अर्थमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून कारभार करताना अजित पवार यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांची उपेक्षा केली. त्यांच्यासाठी आवश्यक निधी अथवा पदे उपलब्ध करून दिली नाहीत. हे एक पक्षातील नाराजीचे प्रमुख कारण आहे, असा दावाही त्यांनी केला.
विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महायुतीच पुन्हा सरकार स्थापन करेल. मुख्यमंत्री म्हणून या सरकारचे नेतृत्व कोण करेल हे आत्ताच सांगता येणार नाही. महायुतीतील ज्या घटक पक्षाला सर्वाधिक जागा मिळतील त्या पक्षाचा मुख्यमंत्री होईल, असेही खंदारे म्हणाले.
भाजप आणि महायुती सरकार यांच्या बद्दल सर्वसामान्य मतदारांमध्ये विश्वास असल्याचे दिसून येत आहे. विशेषतः मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, शेतकऱ्यांना मोफत वीज, विद्यार्थ्यांना स्वावलंबी करण्यासाठी आणि कौशल्य विकासासाठी आखण्यात आलेली योजना अशा कल्याणकारी योजनांना सर्वसामान्य जनतेकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे. त्याबद्दल जनतेमध्ये समाधान आहे. मात्र, पक्षातील बंडखोरांना रोखणे आणि कार्यकर्त्यांमधील नाराजी दूर करणे, हे पक्षासमोर मोठे आव्हान आहे. त्यासाठी राज्यातील वरिष्ठ नेत्यांकडून प्रयत्न होणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने वरिष्ठ पातळीवरून हालचाली देखील केल्या जात आहेत, असेही खंदारे यांनी स्पष्ट केले.