- राज्य
- 'मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देऊ नका'
'मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देऊ नका'
इतर प्रवर्गातून आरक्षण देण्याची नागपूरकर मुधोजीराजे भोसले यांची मागणी
नागपूर: प्रतिनिधी
मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरी यासाठी आरक्षण हवे आहे. त्यामुळे ते इतर मागास प्रवर्गातून न देता अन्य प्रवर्गातून देण्यात यावे, अशी मागणी नागपूरकर मुधोजीराजे भोसले यांनी केली आहे.
मुधोजी भोसले हे मराठा साम्राज्याच्या विस्तारात सिंहाचा वाटा असलेल्या नागपूरकर भोसले घराण्याचे वंशज आहेत. मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र, हे आरक्षण इतर मागास प्रवर्गातून नको तर अन्य प्रवर्गातून देण्यात यावे, असे त्यांचे मत आहे.
मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देऊन त्यांना इतर मागास प्रवर्गातूनच आरक्षण देण्यात यावे, अशी मराठा आरक्षण आंदोलक मनोज तरंगे पाटील यांची आग्रही मागणी आहे. या मागणीसाठी त्यांनी मुंबईतील आझाद मैदानावर उपोषण सुरू केले आहे. त्यांच्या आंदोलनाला सरकारकडून केवळ आज संध्याकाळपर्यंतच परवानगी देण्यात आली आहे. मात्र, सगळ्या मागण्या मान्य झाल्याशिवाय मुंबईतून हलणार नाही, अशी जरांगे पाटील यांची ठाम भूमिका आहे.