- राज्य
- '... अशा गद्दारांच्या वल्गना खूप ऐकल्या'
'... अशा गद्दारांच्या वल्गना खूप ऐकल्या'
आमदार राजदार राजेश मोरे यांना संजय राऊत यांचे प्रत्युत्तर
मुंबई: प्रतिनिधी
आपल्याला घरात येऊन मारण्याची धमकी देणारे आमदार राजेश मोरे यांच्यासारख्यांच्या वल्गना आजपर्यंत खूप ऐकल्या आहेत. ते जर घरी आले तर बाहेर कसे पडतात, तेच मी बघतो, असे प्रत्युत्तर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आमदार मोरे यांना दिले आहे.
आनंद दिघे हे शिवसेनेचे नेते किंवा उपनेते नव्हे तर एक जिल्हाप्रमुख होते, असे उद्गार काढल्यामुळे संजय राऊत यांच्यावर शिवसेना शिंदे गटाचे नेते कार्यकर्ते संतप्त आहेत. त्यातूनच आमदार मोरे यांनी, सांभाळून बोला, नाहीतर घरात घुसून मारू, अशी धमकी राऊत यांना दिली होती. आपल्याला धमक्या देणाऱ्यांना आनंद दिघे समजलेच नाहीत, असा दावाही राऊत यांनी केला.
एकनाथ शिंदे वगैरे मंडळींनी आनंद दिघे यांच्यावर सिनेमा काढला असला तरी देखील त्यातील अर्धे अधिक प्रसंग चुकीचे आहेत. त्यांना दिघे कळलेच नाहीत. राजन विचारे यांनी त्याग केला नसता तर एकनाथ शिंदे दिसलेच नसते. एकनाथ शिंदे, विचारे यांच्यावर टीका करणारे प्रताप सरनाईक यांचे कर्तृत्व काय? त्यांनी महाराष्ट्रासाठी कोणते शौर्य गाजवले, असे सवाल राऊत यांनी केले आहेत.
विचारे हे सरनाईक यांच्या पूर्वीपासून निष्ठावंत शिवसैनिक आहेत. प्रताप सरनाईक चार पक्ष फिरून शिवसेनेत आले. त्यानंतर मंत्री होण्यासाठी बेईमानी केली. त्यांच्यासारख्यांनी विचारे यांच्यासारख्या कट्टर शिवसैनिकांबद्दल बोलूच नये, असा इशाराही राऊत यांनी दिला.