- राज्य
- मराठा आरक्षण आंदोलकांची 'मातोश्री'बाहेर घोषणाबाजी
मराठा आरक्षण आंदोलकांची 'मातोश्री'बाहेर घोषणाबाजी
मराठा आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करण्याची ठाकरे यांच्याकडे मागणी
मुंबई: प्रतिनिधी
मराठा आरक्षणाबाबत शिवसेना उद्धव ठाकरे गटाने आपली भूमिका स्पष्ट करावी, या मागणीसाठी मराठा आरक्षण आंदोलकांनी मातोश्री या उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानाबाहेर जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी ठाकरे यांची भेट होईपर्यंत आंदोलकानी मातोश्रीबाहेर ठिय्या मांडून बसण्याचा इशारा दिला आहे.
मराठा आरक्षणाबाबत विरोधी पक्षांनी देखील आपापल्या भूमिका स्पष्ट कराव्या, अशी मागणी आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. त्यानुसार आपण विरोधी पक्षांकडे प्रथम त्यांची भूमिका काय, याबाबत विचारणा करणार असल्याचे मराठा आंदोलकांनी स्पष्ट केले आहे. त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्या छत्रपती संभाजी नगर दौऱ्याच्या वेळी तिथेही आंदोलकांनी निदर्शने केली होती.
मराठा आरक्षणाबाबत शिवसेनेची भूमिका स्पष्ट करावी, या मागणीसाठी सकल मराठा समाजाच्या शिष्टमंडळाने काल उद्धव ठाकरे यांची मातोश्री निवासस्थानी जाऊन भेट घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, उद्धव ठाकरे शिष्टमंडळाला न भेटता मातोश्रीबाहेर पडले. त्यामुळे आज मातोश्रीवर मराठा क्रांती ठोक मोर्चा आयोजित करण्यात आला. दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास मातोश्री बाहेर जमलेल्या आंदोलकांनी, उद्धव ठाकरे जबाब दो, अशी जोरदार घोषणाबाजी सुरू केली. या आंदोलनामुळे कायदा सुव्यवस्था धोक्यात येऊ नये यासाठी पोलिसांनी मातोश्रीच्या परिसरात बंदोबस्तात वाढ केली आहे.