- राज्य
- शिवसेनेची सोबत चालते, मग आम्हाला दूर का लोटता?
शिवसेनेची सोबत चालते, मग आम्हाला दूर का लोटता?
एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांचा महाविकास आघाडीला सवाल
मुंबई: प्रतिनिधी
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला शिवसेनेची सोबत चालते. मग आमच्या पक्षाला दूर का लोटता, असा सवाल ऑल इंडिया मजलीस ए इत्तेहादुल मुसलमीन पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि माजी खासदार इम्तियाज जलील यांनी महाविकास आघाडीला केला आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीची साथ द्यायला आमची तयारी आहे. त्यासाठीचा प्रस्ताव आम्ही सादर केला असून महाविकास आघाडीकडून उत्तराची वाट बघत आहोत. अंबादास दानवे हे वेगळ्या पातळीवरील नेते आहेत. महाविकास आघाडीत एमआयएमला सहभागी करून घेणार की नाही, याचे उत्तर शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी द्यावे, अशी मागणी ही जलील यांनी केली.
एमआयएमची शक्ती वाढणार
एमआयएम राज्यात किती जागा लढवणार हे आघाडीच्या गणितावर ठरणार आहे. आगामी निवडणुकीत एमआयएमची ताकद वाढलेली दिसून येणार आहे. वास्तविक महाविकास आघाडी आणि महायुती या दोघांनाही जनता कंटाळली आहे. अनेक पक्षांचे मोठे नेते आपल्या संपर्कात असून त्यांच्याकडून पक्षप्रवेशाचा प्रस्ताव आल्यास आपण त्यावर निश्चितपणे विचार करू, असेही जलील यांनी सांगितले.
... तर ताकद दाखवू, आम्ही लाचार नाही
आम्ही आतापर्यंत पाच उमेदवार जाहीर केले आहेत. इच्छुक उमेदवारांना अर्ज देण्याचे काम सुरू झाले आहे. त्यांच्याकडून अर्ज भरून आल्यानंतर पक्षप्रमुख खासदार असदुद्दीन ओवेसी उमेदवारी बाबत निर्णय घेतील. जागांसाठी आम्ही लाचार नाही. आम्हाला महाविकास आघाडीत सामावून घेणार की नाही, हे एकदा स्पष्ट करावे. मग आम्ही आमची ताकद दाखवून देऊ, असा इशाराही जलील यांनी दिला.