'टोलमुक्त महाराष्ट्राचे काय झाले?'

मनसे प्रमुख राज ठाकरे यांचा भाजपला सवाल

'टोलमुक्त महाराष्ट्राचे काय झाले?'

पुणे: प्रतिनिधी

महाराष्ट्र टोलमुक्त करू, असे आश्वासन निवडणुकीपूर्वी देणाऱ्या भारतीय जनता पक्षाने टोल नाका तोडफोडीवर वक्तव्य करण्यापेक्षा टोल मुक्त महाराष्ट्र या आश्वासनाचे काय झाले, याचे उत्तर द्यावे, अशा शब्दात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी भाजप आणि राज्य सरकारवर तोफ डागली. सगळ्या टोल वसुलीची कंत्राटे म्हैसकर नावाच्या एकाच माणसाला मिळतात हे गौडबंगाल काय, असा सवालही त्यांनी केला.

पक्षाच्या संघटनात्मक बांधणीच्या दृष्टीने राज ठाकरे दोन दिवसाच्या पुणे दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते शाखाप्रमुखांच्या कार्याचा आढावा घेत आहे. या दरम्यान त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. 

राज ठाकरे यांचे पुत्र अमित हे नुकतेच राजकारणात सक्रिय झाले आहेत. समृद्धी महामार्गावरील नाशिक जवळच्या टोल नाक्यावर कर्मचाऱ्यांशी झालेल्या वादा नंतर अमित ठाकरे यांच्या ताफ्यातील मनसैनिकांनी टोलनाक्याची तोडफोड केली. याप्रकरणी विचारणा केली असता राज यांनी एकूण दोन प्रक्रियेवरच निशाणा साधला. 

हे पण वाचा  ... म्हणून कार्यकर्ते भाजपमध्ये येतात: बावनकुळे

अमित यांच्या गाडीला fastag यंत्रणा लावलेली असून त्यांनी टोल भरला गेल्याचे नाक्यावरील कर्मचाऱ्यांचे निदर्शनास आणून दिले. मात्र या कर्मचाऱ्याने कोणाशी तरी संपर्क साधून अमित यांच्याशी उद्धट वर्तन केले. त्यामुळेच पुढील प्रतिक्रिया उमटली, असे राज यांनी स्पष्ट केले. अमित यांनी तोडफोड न करता काहीतरी नवीन उभारण्याचा प्रयत्न करावा अशी प्रतिक्रिया व्यक्त करत भाजपाकडून त्यांना कानपिचक्याही देण्यात आल्या. त्यावर राज यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. 

सध्या सर्व रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. सर्वत्र खड्डे पडले आहेत. प्रवासाला विलंब होत आहे. नाशिक मुंबई, मुंबई पुणे या प्रवासाला सात सात तास लागत आहेत. असे असताना तुम्ही टोल आणि रस्ते कर कशाच्या जीवावर घेता, असा परखड सवाल त्यांनी सरकारला केला. 

पुणे मुंबई द्रुतगती महामार्ग उभारल्यानंतर त्याच्या दोन्ही बाजूला जाळ्या लावण्यात आल्या. मात्र समृद्धी महामार्गावर अशी कोणतीही काळजी घेण्यात आलेली नाही. त्यामुळे गाई कुत्रे आणि हरणे महामार्गावर येऊन अपघात होत आहेत. समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघातात आत्तापर्यंत ४०० हून अधिक बळी गेले आहेत. या बळींची जबाबदारी राज्य सरकार किंवा भाजप घेणार का, असा सवालही ठाकरे यांनी केला. 

महाराष्ट्राचा केंद्रीय मंत्री असूनही... 

मुंबई गोवा महामार्गाचे काम सतरा वर्षे उलटून गेल्यावरही पूर्ण होत नसल्याबद्दल राज ठाकरे यांनी संताप व्यक्त केला. महामार्ग वाहतूक मंत्रीपदी नितीन गडकरी यांच्यासारखा महाराष्ट्रातील मराठी माणूस असूनही राज्यातील हा महत्त्वाचा रस्ता होण्यास एवढा विलंब लागतो हे गडकरी यांचे अपयश आहे, असेही ठाकरे म्हणाले. रामाच्या बारा वर्षाच्या वनवासाच्या काळात रामसेतूची उभारणी झाली. मात्र तेवढ्या काळात मुंबई गोवा महामार्ग होत नाही म्हणजे रामायण काळातील लोक अधिक प्रगत होते असे म्हणावे लागेल, अशा शब्दात त्यांनी केंद्र सरकारचीही खिल्ली उडवली.

गाठीभेटी झाल्या म्हणजे युती होत नसते

मागील काही काळापासून राज ठाकरे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह मनसे, भाजप आणि शिवसेना शिंदे गटातील नेते यांच्या गाठीभेटी वाढल्या असल्याकडे लक्ष वेधून मनसे भाजप शिवसेनेच्या महायुतीत सहभागी होणार का, असा सवाल केला असता राज ठाकरे यांनी, केवळ गाठीभेटी झाल्या म्हणजे युती होत नसते, अशा शब्दात त्याला उत्तर दिले. दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुस्तकाच्या प्रकाशनाला राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार उपस्थित राहिले म्हणून राष्ट्रवादी आणि शिवसेनेची युती झाली का, असा सवाल त्यांनी पत्रकारांनाच केला. चटपटीतपणा वाढवण्यासाठी युतीच्या बातम्या तुम्हाला महत्त्वाच्या असतात. आमच्याकडे वास्तविक तसे काही नसते, असेही ठाकरे यांनी स्पष्ट केले. 

 

About The Author

Advertisement

Latest News

महिन्याभरात न्याय मिळाला नाही तर... महिन्याभरात न्याय मिळाला नाही तर...
बीड: प्रतिनिधी आपल्या पित्याच्या हत्येचा सूड घेण्याची भावना मुलांच्या मनात वाढीला लागली असून ती दूर करण्यासाठी आपल्याला न्याय मिळणे आवश्यक...
न्यायवैद्यक प्रयोगशाळा करणार प्रलंबित चाचण्यांचा निपटारा
मराठवाड्यात शेतकऱ्यांच्या डोक्यावर दुबार पेरणीचे संकट
'निष्ठावंतांचा पक्षत्याग ही चिंतेची बाब'
सोमाटणे व वरसोली टोलनाक्यांवरील अनियमिततेबाबत आमदार शेळके यांनी सरकारला धरले धारेवर
मावळ तालुक्यातील लाचखोर मंडलाधिकारी एसीबीच्या जाळ्यात; २ लाखांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले
शिवसेना शिंदे गट आणि रिपब्लिकन सेना यांची युती

Advt