- राज्य
- महायुतीतील घटक पक्षांचा एकच जाहीरनामा
महायुतीतील घटक पक्षांचा एकच जाहीरनामा
सर्व घटक पक्ष प्रचारही एकत्रच करणार
नवी दिल्ली प्रतिनिधी
महायुती मधील भारतीय जनता पक्ष, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट हे तिन्ही मुख्य घटक पक्ष आपापले स्वतंत्र जाहीरनामे प्रसिद्ध न करता महायुतीचा एकत्रित संयुक्त जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात येईल. तसेच तिन्ही घटक पक्ष एकत्रितपणे महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार करतील, अशी माहिती भारतीय जनता पक्षातील वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील घटक पक्षांमध्ये असलेली एकजूट मतदारांसमोर यावी यासाठी घटक पक्षांचे स्वतंत्र जाहीरनामे प्रसिद्ध न करता एक आठवड्याच्या कालावधी महायुतीचा संयुक्त जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात येणार आहे. तसेच प्रचाराचे नियोजन आणि प्रत्यक्ष प्रचार यामध्ये उमेदवार कोणत्याही पक्षाचा असला तरीही सर्व घटक पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते एकत्र काम करतील, असे सूत्रांनी सांगितले.
बंडखोरी रोखण्याचे आव्हान
महायुतीमध्ये तीन प्रमुख पक्ष आणि अन्य काही छोटे घटक पक्ष असल्याने सर्वच पक्षांच्या उमेदवार संख्येवर मर्यादा आले आहेत. त्यामुळे अर्थातच अनेक इच्छुकांची नाराजी पक्ष नेतृत्वाला ओढवून घ्यावी लागणार आहे. मात्र, या नाराजीचे रूपांतर बंडखोरीत होऊ नये यासाठी नेत्यांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे निवडणूक रणनीतीकार अमित शहा यांनी ही बाब लक्षात घेऊन बंडखोरी रोखण्याच्या आणि मत विभाजन टाळण्याच्या सूचना भाजप नेत्यांना दिले आहेत. कोणत्याही परिस्थितीत बंडखोरी होऊ देऊ नका. बंडखोरांना आवरण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न करा. निवडणुकीनंतर राज्यात महायुतीलाच सत्ता स्थापन करायची आहे, हे एकमेव उद्दिष्ट ठेवून कामाला लागा, असेही शहा यांनी नेत्यांना सांगितले आहे.