'ही तुच्छ राजकारणाची नाही, तर एकोपा दाखवण्याची वेळ'

विशेष अधिवेशनाची मागणी करणाऱ्या विरोधकांना सुप्रिया सुळे यांनी सुनावले

'ही तुच्छ राजकारणाची नाही, तर एकोपा दाखवण्याची वेळ'

मुंबई::प्रतिनिधी

सध्याची वेळ तुच्छ राजकारणाची नव्हे तर आपल्यातील एकोपा जगासमोर दाखवण्याची वेळ आहे. ऑपरेशन सिंदूर सुरू असेपर्यंत आम्ही सरकार बरोबर आहोत. सरकारच्या विरोधात आम्ही एक शब्दही काढणार नाही, अशी आमची भूमिका आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी यापूर्वीच ती स्पष्ट केली आहे. त्यामुळेच विशेष अधिवेशनाची मागणी करणाऱ्या विरोधकांच्या पत्रावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील कोणत्याही नेत्याची सही नाही, असे खासदार सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले. 

ऑपरेशन सिंदूरबाबत भारताची भूमिका जगासमोर मांडण्यासाठी विविध देशात गेलेल्या खासदारांच्या शिष्टमंडळामध्ये सुप्रिया सुळे यांचा सहभाग होता. आपण विदेशात असतानाच विरोधकांकडून विशेष अधिवेशनाच्या मागणीबाबत आपल्याला निरोप आला. सर्व शिष्टमंडळ परत आल्यानंतर त्याबद्दल विचार करू असे आपण त्यांना सांगितले. मात्र, शिष्टमंडळाच्या परतीपूर्वीच काँग्रेस आणि काही विरोधी पक्षांकडून संसदेच्या विशेष अधिवेशनाची मागणी करणारे पत्र रवाना करण्यात आले, असे सुळे यांनी सांगितले. 

पाकपुरस्कृत दहशतवाद्यांकडून झालेला दहशतवादी हल्ला आणि त्याला भारताने दिलेले चोख प्रत्युत्तर, या पार्श्वभूमीवर विशेष अधिवेशनाची मागणी करणे अयोग्य आहे. मात्र, संसदेच्या पावसाळी अधिवेशनात सर्व सवालांवर स्पष्टीकरण करण्याची मागणी केली जाईल, असेही सुळे यांनी सांगितले. 

हे पण वाचा  'भारत आणि चीन संबंधात तिसऱ्याची मध्यस्थी नको'

काँग्रेससह 16 विरोधी पक्षांची विशेष सत्राची मागणी

पहलगाम दहशतवादी, हल्ला, उरी, पुंछ, राजौरी या सीमावर्ती भागात पडलेले नागरिकांचे बळी, युद्धविरामाची घोषणा, राष्ट्रीय सुरक्षा आणि परराष्ट्र धोरण हे सध्या देशासमोर असलेले कळीचे प्रश्न आहेत. देशातील नागरिकांना याबाबत स्पष्टीकरण मिळणे आवश्यक आहे. त्यासाठी संसदेचे विशेष सत्र आयोजित करावे, अशी मागणी काँग्रेस सह 16 विरोधी पक्षांनी सरकारकडे केली आहे. भारताच्या प्रतिनिधी मंडळांनी विविध देश आणि आंतरराष्ट्रीय माध्यमिक यांच्यासमोर आपली भूमिका मांडली आहे. मात्र, संसदेला माहिती दिलेली नाही. भारतातील जनता आणि त्यांनी निवडून दिलेले प्रतिनिधी यांना अंधारात ठेवले आहे, असा आरोपही या पत्रात करण्यात आला आहे. 

 

About The Author

Advertisement

Latest News

Advt