- राज्य
- राज्याच्या गृहमंत्रालयाचे ऑडिट करा: सुप्रिया सुळे यांची मागणी
राज्याच्या गृहमंत्रालयाचे ऑडिट करा: सुप्रिया सुळे यांची मागणी
फडणवीस यांच्या कार्यकाळात कायदा सुव्यवस्था धोक्यात आल्याचा आरोप
मुंबई: प्रतिनिधी
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्रालयाचा पदभार स्वीकारल्यापासून राज्यातील कायदा सुव्यवस्था स्थिती धोक्यात आल्याचा आरोप करून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे यांनी राज्याच्या गृह विभागाचे ऑडिट करण्याची मागणी केली आहे.
फडणवीस यांनी गृहमंत्रालयाची जबाबदारी स्वीकारल्यापासून राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडली आहे. याबाबत आपण फडणवीस यांच्या राजीनामाची मागणी केली की त्यावर टीका टिप्पणी केली जाते. चर्चा झडतात. मात्र, फडणवीस गृहमंत्री झाल्यापासून राज्यात गुन्हेगारी वाढली आहे. विशेषतः सत्ताधाऱ्यांचे प्राबल्य असलेल्या पुणे, ठाणे आणि नागपूर या महानगरातच गुन्हेगारी प्रचंड वाढली आहे, अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केली.
या संदर्भात आपण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची देखील भेट घेतली आहे. त्यांच्याशी झालेल्या चर्चेत आपण राज्यातील कायदा सुव्यवस्था स्थिती त्यांना कथन केली आहे. राज्याच्या गृह विभागाचे ऑडिट करण्याची मागणी आपण त्यांच्यापर्यंत ही पोहोचविली आहे, असेही सुळे यांनी स्पष्ट केले.
आमच्यात काही टॅलेंट आहे म्हणून...
अजित पवार आणि अशोक चव्हाण यांच्यानंतर महाविकास आघाडीला, पर्यायाने राष्ट्रवादी काँग्रेसला आणखी काही मोठे धक्के बसणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते जयंत पाटील हे पक्ष त्याग करून भारतीय जनता पक्षाच्या वळचणीला जाणार असल्याची चर्चा आहे. याबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, हल्ली अशा चर्चा रोजच कोणाच्यातरी नावाने झडत आहेत. भाजपकडे तब्बल 100 आमदार असूनही त्यांना आमच्या लोकांची आवश्यकता पडते आहे. याचा अर्थ आमच्याकडे काही विशेष टॅलेंट असणार आहे, अशा शब्दात त्यांनी भाजपची खिल्ली उडवली.